अन्य देत नाही, मग आपण का देयचे ?


                                                                नुकतेच मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटीमध्ये कार्यरत असणाऱ्या
एका व्यक्तीला भेटलो , सुरवातीचे क्षेमकुशल झाल्यावर विषय निघाला तो आपल्या लाडक्या एसटीचा . बोलण्याचा ओघात सदर व्यक्तीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या भारतात सर्वाधिक सवलती देते असे सांगितले . तेव्हापासून मला प्रश्न पडला आहे की, एकीकडे महामंडळ तोट्यात असताना अनावश्यक सवलती कश्यासाठी दिल्या जात आहेत . माझ्यामते या सर्व भाडे सवलतीच्या आढावा घेऊन त्यांची संख्या किमान पातळीवर आणावी . महामंडळाचे काम माझ्या मते ज्या लोंकाकडे स्वतःच्या मालकीचे वाहन नाही त्यांना प्रवाशी सेवा पुरवणे आहे  , न की अनावश्यक भाडे कपातीच्या सेवा पुरवणे . एकीकडे महामंडळाच्या वाहक आणि चालकांना महामंडळाच्या तोट्याचे कारण पुढे करत ,  इतर राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत हास्यास्पद वाटावे , असे मानधन देयचे,  आणि दुसरीकडे आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय या म्हणी प्रमाणे , अनावश्यक प्रवाशी सवलती देत पंधरा हत्ती पोसायचा हे माझ्यामते पूर्णतः अयॊग्यच आहे .
                                                             मी नंतर या संदर्भांत गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या
संकेतस्थळावर चौकशी केली असता , समजले की गुजराती राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या भाड्याची सवलत दिली जात नाही . तेलंगणा सुद्धा प्रवाशाना अत्यंत कमी सोयीसुविधा  देते . या उलट आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना तब्बल ३२ प्रकारच्या भाडेसवलती देते .(शेजारील चित्रात त्याचा फोटो दिसत आहे ) मी अनेकदा नाशिक ते धुळे आणि नाशिक ते कळवण रस्त्यावर अशी अनेक लोक बघितली आहेत जी अपंगाच्या सवलती घेतात , मात्र त्यांच्याकडे बघितल्यावर हे लोक कोणत्या अर्थाने अपंग आहेत अशा प्रश्न पडावा, अशी त्यांची स्थिती होती . सबब सवलती घेणारी व्यक्ती खरोखरच त्यासाठी पात्र आहे का ? याची पूर्ण पडताळणी होणे आवश्यक आहे , जे सध्या होत नाही  असे मला वाटते .असो 
                                                    माझे असे  स्पष्ट म्हणणे आहे की, अन्य राज्य परिवहन सेवा प्रवाशांना कोणत्या सेवा पुरवतात , तेव्हढ्याच सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुराव्यात , अन्य सेवांना सरळ कात्री लावावी .  आधी पोटोबा मग विठोबा हे तत्व  महामंडळाने अंगीकारणे यात काहीच गैर नाही . स्वतः उपाशी राहून दुसऱ्याचे पोट भरणे यात शहाणपणा मुळीच नाही .  यावर काही जण कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्रासारख्या सेवा पुरवते , असे सांगतील , त्यांना मी सांगू इच्छितो की नुसत्या सेवांकडे ना बघता , त्यांच्या आर्थिक स्थितीकडे पण बघावे . त्यांची आर्थिक स्थिती महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीपेक्षा कैक पटीने उत्तम आहे . हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे . 
                                          अनेक खेडे गावांमध्ये एसटी हेच प्रवाशाचे मुख्य साधन आहे . त्यामुळे एसटी महामंडळ टिकणे हे अत्यावश्यक आहे . कारण गरज नसलेल्या सोयीसुविधा देऊन, त्यामुळं वाढलेल्या अनावश्यक तोट्यामुळे संपूर्ण महामंडळ बंद पडणे हे गोरगरीब जनतेला परवडणारे नाही .  प्रवाशांच्या सोयीसाठी याचा अर्थ प्रवाशांना अवाजवी सेवा पुरवणे हा होत नाही .तरी लवकरात लवकर महामंडळाला अनावश्यक सेवा पूर्णतः बंद करण्याची सुबुद्धी होवो अशी सदिच्छा व्यक्त करून सध्यापुरतो थांबतो . नमस्कार .   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?