तोट्यास कारण की ........

                   आपल्याकडे सर्वसाधारणपणे हा मथळा पत्रास कारण की असा असतो . मात्र तो इथे तोट्यास कारण की  ......... असा आहे . याला कारण आहे नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बाबतीत आलेली एक नकारात्मक स्वरूपाची बातमी . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन देण्यात आले असून जे काही वेतन त्यांना देण्यात आले तेही दर महिन्याला त्यांना ज्या दिनांकाला वेतन मिळते त्यापेक्षा दोन दिवस उशिरा देण्यात आल्याची ती बातमी होती . त्याला महामंडळाला झालेल्या तोट्याचे कारण देण्यात आले होते .  मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने सातत्याने नाशिक पुणे प्रवास करतो . माझा हा प्रवास वीक डे आणि शनिवार आणि रविवारी सुद्धा झालेला आहे . त्या दरम्यान मला आढळलेल्या काही बाबींच्या आधारे आपण या तोट्यामागच्या कारणांचा मागोवा घेतला असता समोर आलेले चित्र तुमच्यासमोर मांडण्यासाठी हे लेखन .
                         मी शक्यतो रात्री नऊ ते मध्यरात्री   बाराच्या च्या दरम्यान प्रवाशाला  सुरवात करतो . मी यावेळी नेहमी वीक डे ला  बघतो की , प्रवाशी गाड्या या सुमारे 50 % भरलेल्या असून देखील दर अर्ध्या तासाला सोडण्यात येतात . त्यामुळे एसटीचे अपेक्षित भारमान न होता तोटा होण्यास सुरवात होते . महामंडळाने या बाबत विचार करून वेळापत्रकाची फेरमांडणी करणे आवश्यक आहे .   मी अनेकदा गुजरात राज्य परिवहनच्या बसेसवर विविध जाहिराती बघतो , मला तुरळक अपवाद वगळता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर जाहिराती दिसलेल्या नाहीत . त्याच प्रमाणे बसेसमध्ये बऱ्याच प्रमाणात मोकळी आसने असून देखील नाशिक पुणे या मार्गावर नारायणगाव सारख्या मधल्या गावात जाणाऱ्या लोकांना प्रवास नाकारला जातो . त्यांना महामंडळाने प्रवास करायला परवानगी देण्यात यावी . मी हे जरी प्रकार नाशिक पुणे या प्रवासा दरम्यान बघत असलो तरी" पळसाला पाने तीनच " या मराठी म्हणीप्रमाणे
कमी अधिक प्रमाणात सर्व महाराष्ट्रात असणारच या विषयी माझ्या मनात काहीच शंका नाहीये .
                           मित्रानो,   मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेचा मार्फतसुद्धा  अनेकदा प्रवास करतो , त्या प्रवासादरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे रत्नागिरी , अहमदनगर सारख्या मध्यम आकाराच्या शहरात सुद्धा 2 ते 3 बसस्टँड आहेत यामुळे आस्थापना खर्च मोठ्या प्रमाणत वाढतो ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कमी करायलाच हवा
 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यात अनेक ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी मोठ्या जागा आहेत .त्याचा योग्य पद्दतीने वापर केल्या गेल्यास महामंडळ नफ्यात येण्यास कुणाचीच आडकाठी नसावी . महामंडळाचा धोक्याबाबत बोलायचे झाल्यास अन्य खाजगी बस वाहतूकदाराकडून असलेल्या धोक्याबाबत नेहमी बोलले जाते , माझ्या मते या बरोबर अन्य राज्यांची परिवहन सेवा देखील आपल्या एसटीला धोका आहेत अहमदाबाद ते कोल्हापूर , सुरत ते पंढपूर आणि सुरत ते उस्मानाबाद  अशी गुजरात राज्य परिवहनाची सेवा आहे आपल्या एसटीने पण अश्या लांब पल्याच्या सेवा पुरवण्याचा विचार करावा . कारण  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा ग्रामीण जीवनाच कणा आहे . तो मोडल्यास ग्रामीण जीववनावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही . या विषयी खूप काही बोलण्यासारखे आहे , मात्र तूर्तास इथेच थांबतो, नमस्कार

          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?