अशांत पुर्वांचल


आपली मराठी माध्यमे  काहीश्या अनावश्यक वाटणाऱ्या मुद्द्यांभोवती चर्चाचर्वण करत असताना, आपल्या भारताच्या अतिपुर्वेकडील राज्य असणाऱ्या दोन राज्यांमध्ये सीमा निश्चिती प्रकरणी मोठा वादंग निर्माण झाला आहे. या वादंगामुळे एका राज्यात अशंतः जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडीत झाला आहे.सीमावाद उफळून आलेली  ती राज्ये आहेत आसाम आणि मिझोराम . आणि यामध्ये अशंतः भरडले जाणारे राज्य आहे ,मिझोराम .
                                   या वादाला कारणीभूत आहे, भारतावर ब्रिटीशांचे शासन असताना केलेल्या दोन तरतूदी . सन 1875मध्ये केलेल्या तरतूदीनूसार आसाम राज्याला अधिकची जमिन मिळते, तर याच भागासाठी केलेल्या 1933च्या तरतूदीनूसार मिझोराम या राज्याला जास्तीच्या भूमीचा लाभ होतो. कोणती तरतूद प्रमाण मानायची यावरुन दोन्ही राज्यामध्ये 1987 पासून म्हणजेच मिझोराम या राज्याला पुर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यापासून तीव्र  मतभेद आहेत. दोन्ही राज्यांचा या बाबत भावना तीव्र असल्याने याबाबत सातत्याने वाद निर्माण होत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांनी वाद असणाऱ्या क्षेत्रात मानवी वस्ती न करण्याची भूमीका घेतली आहे.

                       सध्या  सुरु असणारा वाद सुरू झाला तो, मिझोराम राज्याच्या रहिवास्यांनी या सदर वादगस्त क्षेत्रात मानवी वस्ती केली आहे, असे सांगून आसामच्या प्रशासनाने त्या तोडल्यामुळे . यामुळे दोन्ही राज्यातील जनमत प्रक्षुब्ध झाले , आणि आसाम राज्यातील नागरीकांंनी आंदोलने करत मिझोरामला जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गापैकी एका महामार्गाची नाकेबंदी केल्यामुळे मिझोराम राज्यात  माल पाठवणाऱ्या मालवाहतूकदारांना अशंतः अडचणीचा सामना करावा लागत आहे. ज्या भागात हा वाद सुरु आहे, तो भाग बांगलादेशापासून जवळ आहे, तेथून लोक येतात आणि  या वादग्रस्त क्षेत्रात राहतात परीणामी वादास सुरवात होते  , असा मिझोरामचा दावा आहे.
                     1972 पुर्वी मिझोराम राज्य आसामचा एक जिल्हा म्हणून अस्तित्वात होते, त्यामुळे हा वाद फारसा गंभीर नव्हता .1972 ते 1987 पर्यत मिझोराम केंद्रशासीत प्रदेश असल्याने या वादाने गंभीर स्वरुप धारण केले नाही. मात्र 1987 मध्ये मिझोरामला पुर्ण राज्याचा दर्जा दिल्यावर हा वाद  नव्याने उफाळून आला.  याबाबत स्थानिक प्रशासनाचा भाग असणाऱ्या पोलीस खाते आणि इतर सरकारी खात्यातील व्यक्तींचा भावना देखील अतितीव्र असल्याने हा वाद जेव्हा उफाळून येतो, त्यावेळी परीस्थिती गंभीर होते. 
 आसाम या इशान्य भारतातील महत्त्वाचा राज्याच्या सीमा इतर 7 राज्याशी लागतात. त्यातील मणीपूर, त्रिपूरा, पश्चिम बंगाल या राज्याचा अपवाद वगळता अन्य सर्व राज्ये म्हणजेच मेघालय, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश या राज्यांबरोबर आसामचे सीमेबाबत विवाद आहे. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा असणाऱ्या या भागातील हे वाद लवकरात लवकर मिटावेत, आणि या क्षेत्रात शांतता नांदावी, असी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?