मकर संक्रातीच्या निमित्याने ! (भाग 1)

   

 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत हा सण आहे. सुर्याचे उत्तरायण आणि  मकर राशीत भासमान भ्रमण सुरु होण्याचा निमित्ताने हा सण साजरा करण्यात येतो. सुमारे हजार वर्षांपूर्वी सुर्याचा मकर राशीत प्रवेश होताना  उत्तरायण सुरु होत असे. मात्र पृथ्वीचा परांचन गतीमुळे यात फरक पडला आहे. सध्या 22 डिसेंबर रोजी उत्तरायणास सुरवात होते.  तर दर 70 वर्षांनी मकर संक्रातीचा एक दिवस पुढे जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जन्माचा वेळी 12 जानेवारीला मकर संक्रांत हा सण येत असे, आता हा सण 14 किंवा 15 जानेवारीला येतो. हा फरक का पडतो?  हे सांगण्यासाठी आजचे लेखन .सुर्य अथवा इतर ग्रह एखाद्या राशीत जातो, म्हणजे काय ?(माझी माहिती खगोलशास्त्राच्या दृष्टीने असेल,ज्योतिषशास्त्रानुसार नसेल याची नोंद घ्यावी) माहिती मी याच लेखाच्या पुढील भागात देईल. तर  बघूया मकर संक्रांती आणि उत्तररायण यांचा सबंध उलगडणारी माहिती.
        मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यास परीभ्रमण म्हणतात ,तर सुर्याभोवती फिरते, त्यास परीवलन म्हणतात. हे आपणास माहिती असेलच. याशिवाय पृथ्वीला अजून एक गती आहे, परांचन गती, नावाची. या गतीमुळे हे नाट्य घडते. आणि या नाट्यात सह अभिनेत्याचा भुमिकेत असते, सुर्याचे मकरवृत्त आणि कर्कवृत्तदरम्यांचे भासमान भ्रमण. [आपण रोज सुर्य उगवण्याचा ठिकाणाचे निरीक्षण केले असता , ते प्रत्यक्ष पुर्वेकडे न होता  ते काही काळ उजवीकडे आणि डावीकडे गेल्याचे दिसते. यास या लेखात पृथ्वीचे कर्कवृत आणि मकरवृत्तामधील सुर्याचे भासमान भ्रमण संबोधले आहे]
तर या परांचन गतीमुळे पृथ्वीचा अक्ष स्थिर न राहता, भोवऱ्याप्रमाणे फिरतो, (पृथ्वीच्या सुर्या भोवती फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीचा अक्ष यामध्ये साडे तेवीस अंशाचा कोन होत असल्याने पृथ्वीवर ऋतू होतात.  ) 26 हजार वर्षात  पृथ्वीचा अक्ष स्वतःभोवतालची एक फेरी पुर्ण करतो. {भारतीय पुराणकथेनुसार या 26 हजाराचे 26 .लाखात रुपांतर केले की, महायुग पुर्ण होते. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलीयुग या अवस्था याच परांचन गतीमुळे निर्माण होतात.पुराणप्रेमी त्याचा कालावधी लाखात सांगत असले तरी मुळात हा हजार वर्षाचा कालावधी आहे. } याकाळात पृथ्वीचा अक्ष वेगवेगळ्या ताऱ्यांंभोवताली असणारा असल्याने आपला ध्रुव तारा बदलतो. याच परांचन गतीमुळे सुर्याचा मकरवृत्त आणि कर्कवृत्त या भासमान मार्गचा आणि विषवृत्ताचा छेदन बिंदू  बदलतो. तसेच भासमान मार्गाचे नक्षत्रसापेक्ष आंतीम स्थान बदलते, त्यामुळे सुर्याच्या विविध नक्षत्रातील प्रवेश ही बदलतो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मकर संक्रातीची दर 70 वर्षानी बदलणारी स्थिती (हा फरक मानायचा की नाही, यावरुन पंचागकर्त्यांमध्ये सायन पंचाग {सायन पंचागचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दाते पंचाग} आणि निरयन पंचाग {निरयन पंचागचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे टिळक पंचाग} असे दोन गट पडले आहेत) या फरकामुळेच काही हजारो वर्षापुर्वी सुर्य मकर राशीत शिरत असताना होणारी उत्तरायणची सुरवात सध्या सुर्य मकर राशीत शिरताना न होता , त्याचा सुमारे 23 दिवस आधी म्हणजेच 22 डिसेंबर रोजी होते.ते यामुळेच . जर भविष्याचा विचार करता, अजून काही वर्षांनी मकर संक्रात हा सण मार्च अथवा एप्रिल महिन्यात जाउ शकतो. 

वेद साहित्याचा निर्मितीचा कालखंड , अथवा महाभारत युद्धाचा कालखंड काढण्यासाठी याच तंत्राचा वापर करण्यात आला आहे. त्यावेळी आकाशात असणारी स्थिती , बदलत जाउन सध्याचा काळ येण्यासाठी किती वेळ लागू शकतो, याचे गणिताच्या आधारे आकलन करून हा कालखंड निश्चित करतात .
एखादी गोष्ट स्वतःस समजली असली तरी समोरच्यास समजावून सांगणे अत्यंत कठीण असते. समोरच्याची आकलन शक्ती भिन्न असल्यास त्यास ती गोष्ट समजावून सांगणे कठीण असते जी व्यक्ती या परीक्षेत प्रथम दर्जा मिळवून उत्तीर्ण होतो, तो चांगला शिक्षक असतो, हे आपणास माहिती असेलच . त्यामुळे मी आपणास सांगितलेली माहिती आपणास समजलेली असेलच , असे मनोमन मानून इथेच थांबतो, नमस्कार 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?