देशातील बदलते सार्वजनिक परिवहन विश्व आणि आपली एसटी

       सध्या देशातील परिवहन व्यवस्था वेगाने कात टाकत आहे.तामिळनाडु कर्नाटक सारखी मोठी आणि प्रगत राज्येच नव्हे तर हिमाचल प्रदेश सारख्या काहीस्या छोट्याशा राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवा देखील अधिक आरामदायी प्रवाश्यांना हिताचा विचार करणारी सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे इंटरनेटवर या संदर्भात माहिती घेतल्यास सहजतेने दिसून येते.     
कर्नाटक तेलंगणा सारखी राज्ये अंबारी ऐरावत या ब्रँडनेमखाली अत्यंत आरामदायी सेवा ते देखील विविध मार्गांवर देत आहेत.गुजरात राज्याने देखील गेल्या काही महिन्यांत आपल्या सेवेचा दर्जा खुपचं उंचावला आहे. गुजरात राज्याने सर्वसाधारण प्रवाश्यांचा विचार करत आपल्या सर्वसाधारण प्रवाशी गाड्यांमध्ये पुर्वीपेक्षा अधिक आरामदायी आसने पुरवली आहेत बसमधील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी पुर्वीची ३बाय २ची आसनव्यवस्था मोडीत काढत २बाय २ची आसन व्यवस्था सुरु केली आहे. आपल्या एकुण बसेसपैकी जवळपास 50 टक्के बसेस इलेक्ट्रिक साधनांवर चालवण्याचा चंग बांधणारे गोवा हे राज्य असो किंवा अंबारी सारखी भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात लांब 52लोकांची झोपण्याची सोय असणारी बससेवा देणारे कर्नाटक राज्य  परिवहन महामंडळ असो किंवा अत्यंत आधुनिक BR13 प्रकारच्या व्होल्व्हो बसेसची सेवा देणारे तेलंगणा राज्य परीवहन असो देशातील सार्वजनिक परिवहन वाहतूक विशेषतः बससेवा आमुलाग्र बदलत असल्याचे स्पष्ट करत आहेत.
   या पार्श्वभूमीवर आपली एसटी देखील बदलत असली तरी मला प्रामाणिकपणे सांगावेसे वाटतेय की,  आपल्या महाराष्ट्र एसटीचा वेग अन्य एसटीच्या तूलनेत काहीसा कमी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अंमलात आणुन सुद्धा आपण अश्वमेध बससेवेचा विस्तार करुन शकलो नाहीये‌. किंबहुना विस्तार तर सोडाच आहे तितके देखील आपण टिकवू शकलेलो नाही आजमितीस अश्वमेधचा संकोच झाला आहे. इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी घोषणा केल्यानंतर प्रत्यक्ष बस धावण्यापर्यत खुप मोठा वेळ गेला .या वेळात गोव्यासारख्या राज्याने फक्त त्यांच्या राज्यातच नव्हे तर अन्य शेजारील राज्यात इलेक्ट्रिक बसेसची सेवा मोठ्या प्रमाणात तर गुजरात राज्याने अहमदाबाद ते बडोदा या मार्गावर बसेस सुरु देखील केल्या.
     गुजरात सारख्या राज्याने सर्वसामन्याना सेवा देणाऱ्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले‌.त्या बसेसच्या विविध नवीन सेवा सुरू केल्या तसेच या सेवा देणाऱ्या मार्गात वाढ केली.त्यासाठी नविन बसेस देखील विकत घेतल्या .या उलट आपण सन 2016पासून आताआतापर्यंत नविन बसखरेदी बंद केली. जून्याच चेसीसवर नव्याने बस बांधणी करत नवी बस तयार करण्याचा आपण प्रयत्न केला. मात्र चेसीस जून्या असल्याने ही नविन बस बांधणी जास्त आरामदायी झाली नाही.  आजमितीस महामंडळाकडे असणाऱ्या साधारणतः निम्या बसेसचे आयुर्मान दहा वर्षांच्या आसपास आहे.त्यामुळे नियमानुसार त्या लवकरच सेवेतून काढीन घ्यावा लागतील, त्यामुळे प्रवासी संख्या असून देखील पुरेसा गाड्या आपल्या एसटीकडे नसतील.या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी सध्या काही खासगी बसेस भाडेतत्वावर घेवून ही तूट भरुन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र आतापर्यंतचा अनुभवाचा विचार करता भाडे तत्वावरील बसेस या आपल्या    महामंडळास कायमच महाग पडल्या आहेत.
      नविन मार्ग सुरु करण्याबाबत देखील आपणाकडे मोठ्या प्रमाणात अनास्था जाणवते‌.इतर राज्यातील एसटी नवनविन मार्गावर बससेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.मात्र आपल्याकडे याबाबत मोठी अनास्था आहे. इतर राज्यातील बसेस स्वतः च्या राज्याबरोबर अन्य राज्यातील विविध मार्गांवर सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपण अन्य राज्यात जाण्याचा विचार देखील करत नाहीये.आपण आपल्याच राज्यात नविन मार्ग शोधत आहोत.
मात्र चित्र फारच निराशाजनक नाहीये ‌अत्याधुनिक ,BS 6प्रणालीच्या प्रत्येक सिटला सीटबेल्ट असणारे बसेस देखील आपल्या महामंडळात आलेल्या आहेत.इलेक्टिक बसेसचा देखील आपण झपाट्याने विस्तार करत आहोत पुणे ते नाशिक कोल्हापूर ते पुणे ,पणजी ते कोल्हापूर अस्या विविध मार्गांवर शिवनेरी सेवा महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे.सध्याचे राज्य  सरकार हे मागील राज्य सरकारपेक्षा वेगाने निर्णय घेत आहे, त्यामुळे आपले महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ नक्कीच बदलेल असी आशा करायला हरकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?