भारत चीन संघर्ष आणि जागतिक राजकारण हे सुलभतेने उलगडणारे पुस्तक " "शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत चढती कमान वाढते तणाव"


चीन, ज्या 7देशांबरोबर भारताची जमिनीवर सीमा आहे त्या देशांमध्ये दुसरी मोठी भुसीमा असणारा देश म्हणजे चीन, (पहिली बांगलादेश {भारत बांगलादेश सीमा वेडीवाकडी असल्याने सहज लक्षात येत नाही.मात्र ती सीमा सरळ केल्यास भारताची सर्वाधिक सीमा बांगलादेशाबरोबर आहे}) नकाश्यात ज्या देशाची भारताबरोबरची सीमा बघताना अनावधानाने नेपाळ आणि भुतान बरोबरची त्या देशाची  सीमा देखील भारताची सीमा समजली जाउ शकते असा देश म्हणजे चीन, आपणावर 1962साली युद्ध लावणारा देश म्हणजे चीन, भारताबरोबर ब्रिक्स, एस.इ ओ तसेच  एशियन डेव्हलपमेंट  फंड सारख्या  जागतिक व्यासपीठांवर बरोबरचे स्थान मिळवणारा देश म्हणजे चीन. तर असा चीन भारताचा शत्रू आहे की स्पर्धक आणि भारत आणि चीन या दोन देशांतील राजकारणाचे जागतिक संदर्भ समजून घेयचे असल्यास ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी लिहिलेले आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित असे "शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत चढती कमान वाढते तणाव" हे पुस्तक वाचायलाच हवे. जे मी नुकतेच सावाना घ्या मदतीने वाचले.
      22 प्रकरणातून त्यांनी हा विषय सविस्तरपणे मांडला आहे.सुमारे 214 पानांच्या या पुस्तकात सुरवातीच्या 10प्रकरणात  ,शी जिनपिंग यांची कार्यपद्धती ,1978पासून चीन कसा बदलत गेला , चीनमधील फुटीरतावाद ज्यात तिबेट आणि संकियांग वर (1962साली चीनने जिंकलेला पुर्व लडाखचा प्रदेश ज्या प्रांतात चीनने ठेवला आहे,असा एकेकाळचा मुस्लिमबांधव बहुसंख्य असलेला प्रांत)चा समावेश होतो त्यावर स्वतंत्र एकेका प्रकरणातून ,तसेच तैवान ,मकाऊ , हाँगकॉन यावर एकत्रीत एकाच प्रकरणात प्रकाश टाकत तसेच तिआनमेन हत्याकांडावर एका स्वतंत्रप्रकरणातून ,तर चीनचा विस्तारवाद, माओंचे स्वप्न, चीनच्या शासनापुढील आव्हाने तसेच जगात चीनची प्रतिमा चांगली व्हावी यासाठी केले जाणाऱ्या प्रयत्नांची एकेका प्रकरणात माहिती देत लेखक वर्तमान चीनचे तपशीलवार चित्र आपणासमोर मांडतो‌ 
  तर 11ते 17 या प्रकरणातून तसेच 22व्या प्रकरणातून  लेखक भारत आणि चीन संबंधांवर आपणास माहिती देतो.ज्यामध्ये भारत आणि चीन यातील इतिहासाचा भारताच्या स्वातंत्र्यापर्यतचा आढावा,1962नंतरचे दोन्ही देशांतील संबंध, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात या संबंधात कसा बदल झाला तसेच मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात  त्यावेळच्या आपल्या  परराष्ट्रमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वूहान भेटीमुळे काय झाले? चीनच्या भारतविरोधी धोरणावर आपणाकडे काय उत्तर आहेत? चीनचे महत्वकांक्षी  प्रकल्प असणारे बेल्ट रोड आणि सिल्क रूटचे भारतावर होणारे परिणाम यावर प्रत्येकी एका प्रकरणातून तर डोकलाम आणि गलवान क्षेत्रातील घूसखोरीवर दोन प्रकरणातून लेखक आपणास सविस्तरपणे माहिती देतो. 
   या खेरीज 18 ते 22,पर्यतच्या प्रकरणातून आपणास चीन अमेरिका व्यापार युद्ध , चीनच्या नागरिकांची
चीनविषयक मते, करोना, आणि भविष्यात चीन काय करू शकतो या विषयी माहिती मिळते.
     इंग्रजीत या विषयावर अनेक पुस्तके आहेत.मात्र आपल्या मराठीतील हे सविस्तर माहिती देणारे मोजक्या पुस्तकांमधील एक आहे,असे मानल्यास चूकीचे ठरणार नाही.लेखक स्वतः 7वेळा चीनमध्ये रिपोर्टर म्हणून गेला आहे.लेखकास आंतरराष्ट्रीय राजकारणाची मोठी जाण आहे ‌मराठीतील अनेक नामांकित वृत्तपत्रांसाठी लेखकाने आंतरराष्ट्रीय घडामोडीवीषयक लेखन केले आहे. त्यांची या पुस्तकाखेरीज आंतरराष्ट्रीय संबंधांवर अन्य पुस्तके प्रकाशित झाली आहेत,हे बघता हे पुस्तक किती माहितीपूर्ण असेल याचा अंदाज बांधता येतो. आपल्या मराठीत आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोजकीच पुस्तके आहेत.त्यातही बहुसंख्य पुस्तके मुळांच्या इंग्रजी पुस्तकाचे अनुवादच अधिक आहेत .त्या पार्श्वभूमीवर मुळातून मराठीत लिहिलेले हे पुस्तक वेगळे ठरते.या पुस्तकातील प्रत्येक  प्रकरणासाठी कोणते संदर्भ वापरण्यात आले याची माहिती ते प्रकरण संपल्यावर देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर एखाद्या विशिष्ट प्रकरणाचे संदर्भ हवे असतील तर चटकन सापडतात,हे या पुस्तकाचे विशेषच म्हणायला हवे. हे पुस्तक आपणास खुप माहिती ती देखील सहजसोप्या भाषेत देते.ज्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करायचा आहे ‌अस्या व्यक्तींनी त्यांचा अभ्यास या पुस्तकापासून सुरू केल्यास उत्तमच होईल.फक्त आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासाचं नव्हे तर सर्वसामान्य नागरीकास देखील जागरुक नागरिक होयचे असल्यास हे पुस्तक मदतच करेल.मग वाचणार ना हे पुस्तक .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?