वाचक मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जानेवारी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला दिलीप प्रभावळकर, सुरेखा कुडची, प्रदीप पटवर्धन यांची प्रमुख भूमिका असलेला आणि अजय फणसेकर दिग्दर्शित ‘रात्र आरंभ’ हा चित्रपट किंवा मार्च २००४ साली प्रदर्शित अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार, तुषार दळवी यांची प्रमुख भूमिका असलेला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘देवराई’ हा चित्रपट आठवतो का? मी हे विचारतोय कारण हे फक्त करमणूकप्रधान चित्रपट नव्हते, तर माहितीपटाच्या चौकटीत जाणारे; मात्र त्याचवेळी माहितीपटाचा अवजडपणा दूर सारत मनोरंजन करणारे देखील होते. हे दोन्ही चित्रपट स्किझोफेनिया या गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजाराबाबत मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करणारे होते. ‘रात्र आरंभ’ हा चित्रपट मराठीतील पॅरानॉइड स्किझोफ्रेनियावर (Paranoid Schizophrenia
) आधारित पहिला चित्रपट मानला जातो तर ‘देवराई’ हा चित्रपट मानसिक आरोग्य विषयावर अत्यंत संवेदनशीलपणे आणि मोठ्या प्रमाणात सखोलतेने भाष्य करतो. स्किझोफेनिया हा एक गंभीर मानसिक आजार असून व्यक्तीच्या विचारसरणी, भावना आणि वर्तनावर परिणाम करतो. या आजारामुळे वास्तव आणि कल्पना यामधील फरक ओळखणे कठीण होते, ज्यामुळे रुग्णाला भास (Hallucinations), चुकीचे ठाम विश्वास (Delusions) आणि विस्कळीत विचार यांचा अनुभव येऊ शकतो. आपल्या शरीरात मेंदूच्या डाव्या बाजूला डोपामाइन नावाचा एक अंतःस्राव होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास सदर आजार होतो (आणि कमी झाल्यास पार्किन्सन हा आजार होतो). या आजारात पूर्णतः बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सदर आजार व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. हा आजार ज्या व्यक्तीला होतो त्याच्या काम करण्याच्या जाणिवा नाहिशा होतात आणि ती व्यक्ती पूर्णतः परावलंबी बनते.
भारतात हा आजार असल्याचे प्रमाण सुमारे १% आहे. हा आजार काही प्रमाणात अनुवंशिक असतो. हा आजार बहुतांश वेळेला अधिक बुद्धिमान असलेल्या लोकांत आढळतो. नोबेल विजेते गणिततज्ज्ञ जॉन नॅश, ज्यांच्या जीवनसंघर्षावर चित्रपट आलेला आहे, हे अशा बुद्धिमंतांपैकी एक होते. त्यांच्या जीवनावरील ऑस्कर विजेताचित्रपट ‘अ ब्युटीफुल माइंड’ आपले अनेक गैरसमज दूर करतो. जॉन यांना ऐन तारुण्यात या आजाराने ग्रासले; मात्र त्यावर त्यांनी यशस्वी मात केली आणि गणितातील अत्यंत अवघड अशा गेम थिअरीवर संशोधन करून नोबेल पुरस्कार मिळवला. मूळ इंग्रजी भाषेतील या चित्रपटाचा हिंदी अनुवाद युट्यूबवर उपलब्ध आहे. याबाबत अधिक जाणून इच्छिणारे तो व्हिडिओ पाहू शकतात. स्किझोफेनिया हा मेंदूशी संबंधित एक गुंतागुंतीचा आजार असून अनेक वेळा या आजाराबद्दल चुकीच्या समजुती समाजात आढळतात; जसे की रुग्ण हिंसक असतात किंवा त्यांना बरे होणे शक्य नाही. या गैरसमजुती दूर करण्यासाठी २४ मे हा आंतरराष्ट्रीय स्किझोफेनिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो, तर २४ मे समाविष्ट होईल असा एक दिवस धरून आंतरराष्ट्रीय स्किझोफेनिया जनजागृती आठवडा साजरा करण्यात येतो. यंदा २०२६ या वर्षी १८ मे ते २४ मे दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या आठवड्यात साधारणतः आजाराविषयी माहिती देणारे विविध शैक्षणिक कार्यक्रम, चर्चासत्रे आणि जनजागृती मोहिमा आयोजित केल्या जातात. यामुळे समाजात मानसिक आजारांविषयी सहानुभूती आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. परिणामी, रुग्णांना वेळेवर मदत मिळून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. हा सप्ताह दरवर्षी एक संकल्पना घेऊन त्यानुसार साजरा करण्यात येतो. यंदाच्या २०२६ ची संकल्पना आहे – “स्वीकारा आणि साथ द्या”.
यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे आजार मुळात काय आहे ते समजून घेणे, जे आपण लेखाच्या सुरुवातीलाच पाहिले. आता २०२६ मधील संकल्पनेच्या दुसऱ्या भागाकडे येऊया – “साथ द्या”.
साथ देण्यासाठी आपणास प्रथम त्यांना स्वीकारावे लागेल. “स्वीकारा” हा संदेश समाजातील दृष्टीकोन
बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना समाजात दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहण्याऐवजी त्यांना टाळले जाते किंवा त्यांच्याबद्दल भीती बाळगली जाते. हीच गोष्ट रुग्णांसाठी अधिक त्रासदायक ठरते. स्किझोफेनिया हा कोणाच्याही आयुष्यात येऊ शकणारा आजार आहे. तो कोणत्याही व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसतो. त्यामुळे अशा व्यक्तींना दोष देणे किंवा त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहणे चुकीचे आहे. “स्वीकारा” या संकल्पनेत प्रत्येक व्यक्तीला समानतेने वागवण्याचा संदेश दिला जातो. स्वीकार म्हणजे केवळ सहन करणे नव्हे, तर त्या व्यक्तीला समजून घेऊन तिच्या परिस्थितीचा आदर करणे होय. कुटुंबीय, मित्र आणि समाजाने जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर रुग्णाचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याच्या उपचार प्रक्रियेलाही गती मिळते. कुटुंबीय आणि मित्रांनी जर रुग्णाला समजून घेतले आणि त्याला साथ दिली, तर त्याचा उपचारांवर सकारात्मक परिणाम होतो. नियमित औषधे घेणे, समुपदेशनाला जाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे यासाठीही कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरतो.साथ द्या” या संकल्पनेत समाजानेही आपली भूमिका ओळखणे गरजेचे आहे. कार्यस्थळे, शैक्षणिक संस्था आणि समाजातील इतर घटकांनी अशा व्यक्तींना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांना संधी दिल्यास तेही आपले कौशल्य सिद्ध करू शकतात.
या जनजागृती आठवड्यात विविध सहाय्य गट, समुपदेशन सेवा आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य दिशा मिळते.मानसिक विकाराबाबत आपल्याकडे अनेक गैरसमजुती आहेत. त्या दूर होणे अत्यावश्यक आहे. तर आणि तरच यासारख्या दिनाचे खरे औचित्य साजरे होईल, हे खरे.
टिप्पण्या