महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा


नाशिकमधील काही धाडसी आणि समाजभान जपणाऱ्या महिला पत्रकारांनी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘शौर्य रणरागिणी न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि सामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या या माध्यम संस्थेचा प्रथम वर्धापन दिन नुकताच नाशिकमध्ये अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर ‘शौर्य पद्मराज रत्न पुरस्कार’ आणि पत्रकार सन्मान सोहळ्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली.

सातपूर येथील मोतीवाला कॉलेजच्या भव्य ऑडिटोरियममध्ये आयोजित या सोहळ्याला राज्यभरातून विविध क्षेत्रांतील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून समाजभूषण नानजीभाई खेमजीभाई ठक्कर, पश्चिम नाशिकच्या आमदार सीमाताई महेश हिरे, नगरसेविका मयुरीताई अंकुश पवार, ‘मिसेस इंडिया २०२४’ स्मिता अहिरे सामाजिक कार्यकर्ते संदीप शर्मा, कलाकार मयुरी सोनी तसेच ‘दैनिक समर्थ गांवकरी’चे संपादक विश्वासराव आरोटे उपस्थित होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा देत ‘शौर्य रणरागिणी न्यूज’च्या कार्याचे कौतुक केले.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘शौर्य पद्मराज रत्न’ पुरस्काराने करण्यात आलेला सन्मान. समाजकारण, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिला पत्रकारांनी उभारलेले हे व्यासपीठ समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. महिलांना अभिव्यक्तीची ताकद देणारे हे माध्यम भविष्यात आणखी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात ‘शिक्षणाची शिदोरी’ या सामाजिक उपक्रमालाही विशेष प्रतिसाद मिळाला. गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलित करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम ‘शौर्य रणरागिणी न्यूज’च्या संवेदनशीलतेचे प्रतीक ठरला.

सूत्रसंचालन अभिजीत कन्नडकर आणि अश्विनी पुरी यांनी प्रभावीपणे केले, तर मयुरी सोनी यांच्या भक्तिमय गीतांनी वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य संपादिका गायत्री योगेश लचकेयांच्यासह संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.
समाजाभिमुख पत्रकारिता, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम घडविणारा ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा हा प्रथम वर्धापन दिन सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव

असी आहे आपली एसटी .....!