दिव्यांगांविषयीच्या आपल्या जाणिवा वाढवणारा चित्रपट 'कोशीश

चित्रपट हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. हे माध्यम जर खुबीने वापरले तर फार मोठा संदेश सहजतेने देता येतो. इतर ‌वेळी काय कटकट आहे, असे म्हणून संदेश  देणाऱ्याचे नावे बोट मोडण्याची वेळ  येण्याची शक्यता १०० टक्के आहे असे सदेश देखील समाजात मोठ्या प्रमाणात देण्याची ताकद या माध्यमात आहे.ती देखील अरे आपल्याला संदेश देण्यात आला आहे,याची विशेष वेगळी जाणीव न होता. मात्र इतकी प्रभावी ताकद असून देखील या माध्यमाचा सकारात्मकतेने वापर केले गेल्याची उदाहरणे फारच तूरळक आहेत‌. या तूरळक उदाहरणामध्ये नाव घ्यावेच लागेल असा चित्रपट म्हणजे कोशीश.
१९७२ साली प्रदर्शित झालेला अत्यंत संवेदनशील आणि आशयघन हिंदी चित्रपट म्हणून कोशीश ओळखला जातो. त्याचे दिग्दर्शक गुलझार आहेत. या चित्रपटात जया बच्चन आणि संजीवकुमार यांनी साकरलेली  मूक-बधिर दांपत्याची भूमिका आपणास विचार करायला भागच पडते
‘कोशीश’ची कथा हरिचरण आणि आरती या दोघांच्या आयुष्याभोवती फिरते. बोलता व ऐकता न येणाऱ्या दोन व्यक्ती समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी कशी झुंज देतात, याचे हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात आहे. संवादांपेक्षा हावभाव, नजरा आणि देहबोलीच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याचे आव्हान या दोघांनी अत्यंत ताकडीने पेलल्याचे चित्रपट बघताना जाणवते. विशेषतः संजीव कुमार यांनी साकारलेला संवेदनशील, स्वाभिमानी पती आणि जया बच्चन यांनी रंगवलेली प्रेमळ, जिद्दी पत्नी प्रेक्षकांच्या मनात घर करून रहातात
चित्रपट केवळ प्रेमकथा नसून तो मानवी जिद्द, स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची कहाणी सांगतो. समाजातील दिव्यांग व्यक्तींविषयी असलेले पूर्वग्रह, त्यांचे दैनंदिन संघर्ष आणि कुटुंबव्यवस्थेतील भावनिक नातेसंबंध यांचे वास्तवदर्शी चित्रण येथे आढळते. संगीत, पार्श्वसंगीत आणि शांततेचा वापर अत्यंत प्रभावीपणे करण्यात आला आहे.
‘कोशीश’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील वास्तववादी आणि संवेदनशील कलाकृतींपैकी एक मानला जातो. मानवी मूल्यांची जपणूक आणि आशावादी दृष्टिकोन यामुळे हा चित्रपट आजही तितकाच अर्थपूर्ण वाटतो.
    चित्रपट निर्माण होवून ५४ वर्षे होवून गेली आहेत.मात्र त्यात मांडलेला विषय आजही तितकाच प्रासंगिक वाटतो‌.आज दिव्यांगाबाबत काही प्रमाणात आशादायी चित्र निर्माण होत आहे.पण आजच्यापासून ५४ वर्षापूर्वी दिव्यागांची स्थिती फारशी उत्तम नव्हती. त्यामुळे त्यावेळी असे चित्रपट तयार करणे खुपच धाडसाचे म्हणता येईल.तरी हे धाडस कसे आहे? आणि त्यात दिव्यांगाचा समस्येचा कोणत्या प्रकारे वेध घेतलेला आहे, हे समजण्यासाठी हा चित्रपट किमान एकदा तरी बघावाच,असा आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

31वर्षे अभिमानाची*

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

वंदन महान शास्त्रज्ञाला