कर्तृत्व सिद्ध करायला सांगणारे गाणे, 'आकाशी झेप घेरे पाखरा'
दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे वेळ साधारणत: रात्रीच्या नऊच्या आसपसाची. पुणे शहरातील मंडई या भागातून दत्तवाडीतून जाण्यासाठी बस मध्ये प्रवास करत होतो. बस मध्ये एक सत्तर वर्षाचे आजोबा सुद्धा प्रवास करत होते माझ्याबरोबर. आजोबांनी त्यांच्या मोबाईलवर गाणी लावली होती अर्थात आजोबांचे वय बघता त्यांनी हेडफोन न लावता स्पीकरवर फोन ठेवत गाणे सुरू केले होते त्यामुळे ते गाणे मला पण ऐकू आले गाण्याचे बोल होते 'आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याच्या पिंजरा' . माझा प्रवास दहा मिनीटात संपला. मात्र अत्यंत व्यापक अर्थ आणि सुंदर गेयता असलेल्या या गाण्यामुळे सुरु झालेली माझी विचार प्रक्रिया अजून सुरूच आहे.
१९७६ साली आलेल्या 'आराम हराम है', या मराठी चित्रपटातील हे गाणे. चित्रपटाचे नाव जरी हिंदी वाटत असले तरी चित्रपट मराठी आहे तो देखील १९७६ साली ही गोष्ट विशेष आहे. सुमारे दोन वर्षापुर्वी मराठी चित्रपटांची नावे विनाकारण इंग्रजीत ठेवली जातात,असी टिका केली जात होती.त्या पार्श्वभुमीवर आजपासून ५० वर्षापूर्वी हिंदीशी साध्यर्म साधणारे नाव मराठी चित्रपटाला देणे एक वेगळेच म्हणायला हवे असो मात्र चित्रपटाचे नाव हा काही या लेखाचा विषय नाही.त्यामूळे इतकेच
तर कष्ट, स्वातंत्र्य, नैतिकता आणि खऱ्या मूल्यांचा संघर्ष दाखवलेल्या या चित्रपटातून आपणास जीवनात मिळालेल्या सुख-सुविधांनी आपला पाया हरवता कामा नये. तसेच जीवनात स्वावलंबन व मेहनतीची महत्त्वाची भूमिका आहे, हा संदेश मिळतो.या चित्रपटातील जगदिश खेबुडकरांनी लिहलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्व केलेले आणि गायलेले सुद्धा सुमारे साडेसहा मिनीटाचे गाणे म्हणजे आकाशी झेप घेरे पाखरा ,सोडी सोन्याचा पिंजरा .
मनुष्याने घरच्या श्रीमंतीवर आयुष्य न काढता, स्व कर्तृत्व सिद्ध करायला हवे. हा आयुष्यातील महत्तवाचा संदेश या गाण्यातून दिला आहे.वाडवडीलांच्या पुण्याईवर आरामात जिवन जगणे हे विषसमान आहे. मनुष्याने स्व
कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जगाचा रहाटगाड्याचा अनुभव घेतलाच पाहिजे. त्यासाठी त्याला ज्याला इंग्रजीत सेफ झोन म्हणतात, तो सोडून इतर ठिकाणी जावे लागले तरी जावे. देवाने जगातील प्रत्येक व्यक्तीला सामर्थ्य दिले आहे, फक्त आपण आपले सामर्थ्य ओळखायला हवे. आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टी व्यक्तीने सोडल्याच पाहिजे. कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही.आपण स्व कर्तृत्वावर एखादी गोष्ट मिळवली की त्याची गंमत काही वेगळीच असते. हा संदेश हे गाणे देते.
या गाण्याचे अजून एक वैशिष्ट म्हणजे या गाण्यात साधण्यात आलेली यमकांची अनोखी गेयता.जी गाणे ऐकताना मराठी भाषा किती उत्तम आहे.एकमेकांशी जूळणाऱ्या आणि मोठे अर्थपुर्ण असणाऱ्या शब्दांनी मराठी भाषा किती समृद्ध आहे.याची प्रचिती आपणास गाणे ऐकताना होते
मग ऐकणार ना हे मोठे अर्थपुणे आणि प्रचंड गेयता असणारे गाणे.
टिप्पण्या