अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग १)
गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे फेसबुक पेज बघितल्यावर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धडाडीच्या म्हणता येतील अशा विविध बसस्थानकांना दिलेल्या भेटी आणि या भेटीदरम्यान विविध अधिकाऱ्यांना फैलावर घेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे पोस्टर. हे पोस्टर बघून अनेकांना वाटू शकते चला आता आपली एसटी सुधारते आहे. काम न करता आतापर्यंत फक्त पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मस्तपैकी कामाला लावला आहे सरनाईक साहेबांनी. असाच कार्यक्षम मंत्री असावा. तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही थांबा. वस्तुस्थिती काहीशी भिन्न आहे.
अनेकांना वाटते एसटी बस स्टॅन्डचे वॉशरूम्स नेहमीच खराब असतात. मात्र वॉशरूमच्या नावाने खडे फोडणारे लोक हे विचारात घेत नाहीत की, आपल्याकडे सार्वजनिक जीवनात कसे वागावे, याचे शिक्षण देणारी व्यवस्थाच नाहीये. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत अनेकदा प्रवास करतो. या प्रवाशादरम्यान मी असे अनेक प्रवासी बघतो की, जे वॉशरूम वापरून झाल्यावर पुरेसे पाणी टाकत नाहीत. आणि त्याविषयी त्यांना सांगितले तर त्यांच्या दृष्टीकोन तुम्हाला गरज आहे ना तुम्ही टाका किंवा तू आम्हाला सांगणारा कोण हे वॉशरुम तुझ्या मालकीचे आहे का? या पद्धतीचा असतो.
आपण जे वॉशरुम वापरत आहोत ते सार्वजनिक आहे आपल्या खाजगी मालमत्तेचे नाही. आपले वापरून झाल्यावर दुसरे कोणीतरी अन्य लोक ते वापरणार आहेत त्याला स्वच्छ द्यायला नको का याची काही जाणीवच लोकांच्या नसते.
जी गोष्ट वॉशरुमची तीच गोष्ट कचऱ्याची. एखादी गोष्ट वापरून झाल्यावर जो कचरा निर्माण होतो तो कचरा नागरिक कचरा पेटीत टाकायला कंटाळा करतात, आणि ते जिथे बसलेले आहेत तिथेच ते टाकून जातात. अरे आपल्या नंतर इथे कोणीतरी बसणार आहे त्यात स्वच्छ नको का हे देखील त्यांना समजत नाही.
या बेजबाबदार प्रवाश्याची शिक्षा मात्र मात्र गरीब असा सफाई कामगार भोगतो. सफाई कामगार हा सुद्धा आपल्यासारखाच हाडामासाचा माणूस आहे. आपण जसे काम करून थकतो. तसा तोही थकतो. आपल्या बेजबाबदारपणामुळे त्याला खूपच जास्त मोठ्या प्रमाणात काम करावे लागते हे या बेजबाबदार प्रवाशांना कोणीतरी सांगायची गरज आहे. या बेजवाबदार प्रवाश्यांना दंड होत असला तरी मुळातील बेजबाबदार प्रवाशांची संख्या आणि दंड होणाऱ्या प्रवाश्यांची संख्या यांच्या विचार करता मुळात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत दंड होणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच कमी असते. असे मला एसटी बसमधून फिरताना अनेकदा आढळते.
अस्वच्छता दिसल्यास प्रथम वर्गातील अधिकारी द्वितीय वर्गातील अधिकाऱ्यांवर आणि द्वितीय वर्गाचे अधिकारी या सफाई कर्मचाऱ्यांवर चिडतात मात्र मुळातील वस्तुस्थिती फारच कमी अधिकारी समजून घेतात. बरे या सफाई कामगारांचे वेतनही काही खूप नसते. अत्यंत तुटपुंज्या पगारात सध्याच्या महागाई चा विचार करता आपला संसार कसा पुढे न्यायच्या या चिंतेत ते असतात.त्यातच या बेजवाबदार प्रवाश्यांमुळे वाढणारे जास्तीचे काम यामुळे त्याला इंग्रजीत वर्क सॅटिस्फॅक्शन म्हणतात त्याचा या सफाई कामगारांमध्ये पूर्णतः अभाव आढळतो.त्यामुळे त्यांच्या कामाच्या दर्जा अजूनच ढासळतो. दर्जा ढासळल्यावर परत अधिकारी वर्गांचे बोलणे त्यांना ऐकून घ्यावे लागते. स्वतःची फारशी मोठी चूक नसताना बोलणे ऐकून घेतल्यामुळे त्यांच्या कामाच्या दर्जा अजूनच मोठ्या प्रमाणात ढासळतो आणि एक दुष्ट चक्र सुरू होते.
हे चक्र भेदायचे असल्यास, नागरिकांना जबाबदार नागरिक करणे आवश्यक आहे तसेच सफाई कामगारांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचा वेतनात वृद्धी करणे.तसेच बेजबाबदार नागरिकांमुळे त्यांना जे अतिरिक्त काम करावे लागते ते लक्षात घेऊन जर थोडेसे अस्वच्छता आढळून आल्यास थेट कडक कारवाई न करता अन्य उपाय योजावे लागतील ज्यामुळे सफाई कर्मचारी सुद्धा आपले काम करताना ते मन लावून करू शकतील आणि एसटी महामंडळाची वॉशरूम खऱ्या अर्थाने स्वच्छ होतील असे मला वाटते.
मला याच लेखामध्ये एसटी बस एखाद्या हॉटेलमध्ये थांबली असता तेथील खाद्यपदार्थ खराब का असतात ? यावर बोलायचे होते मात्र आधीचाच मुद्दा खूप मोठा झाल्याने मी यावर पुढच्या भागात बोलेल. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र
टिप्पण्या