प्रवास एका ध्यासपुर्तीचा 'माझंही एक स्वप्न होतं’
अमिताभ बच्चन यांच्या नेत्रदानाविषयी टिव्हीवरील एका जाहिरातीमध्ये एक वाक्य आहे त्यावेळेस कॅमेरा त्यांच्या पायावर स्थिर असतो कुछ लोगों के लिए मेरी आवाज ही मेरी पहचान है! भारतातील सर्वात मोठा सहकारी दुग्ध प्रकल्प असणाऱ्या अमूल बाबत सुद्धा आपल्याला असेच म्हणता येईल भारतातील दुग्ध प्रकल्प म्हणजे अमूल असीच जगभरात फार मोठ्या प्रमाणात ओळख आहे. अमुल टेस्ट ऑफ इंडिया अमुल दूध पीता हे इंडिया अर्टली बर्टली डेलिशियस अमुल या अनेक स्लोगननी अमुलला आपल्या भारताच्या घराघरात स्थान दिले आहे. मी एस पी कॉलेजमध्ये शिकत असताना स्पर्धा परिक्षेचा सुद्धा अभ्यास करत होतो त्यावेळेस कॉलेज संपल्यावर क्लासला जाण्याचा आधी जो थोडासा मोकळा वेळ मिळत असे. त्यावेळेस पोट भरण्यासाठी मी अमुल कुल पीत असे. आपला देखील अमुलबाबत हाच अनुभव असेल असो
गुजरात मधील काहीसा दुष्काळी भागातील असणाऱ्या आनंद या गावी केरळी ख्रिश्चन असलेल्या वर्गिस कुरीयन यांनी कष्टाने उभारलेल्या प्रकल्प म्हणजे अमुल. भारतातील दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी वर्गीस कुरियन यांनी दिलेल्या योगदानामुळे आपण त्यांना मिल्क मॅन ऑफ इंडिया असे म्हणतो. त्यांनी अमुलच्या उभारणीतील योगदान त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट त्यांना अमूल उभारण्याची प्रेरणा याविषयी त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेले आहे. आपल्या सुदैवाने राजहंस प्रकाशन तर्फे प्रकाशित 'माझे एक स्वप्न होतं' या त्यांच्या अनुवादित आत्मचरित्रात हे आपणास मराठी भाषेत वाचायला मिळते.या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुजाता देशमुख यांनी केला आहे.
वर्गीस कुरियन यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नव्हता. गुजरातमधील आनंद येथे काम करताना त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहिल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला मिळावा, मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि दूध उत्पादकांच्या मालकीची सक्षम सहकारी व्यवस्था उभी राहावी, या विचारातून त्यांच्या कार्याला दिशा मिळाली. याच प्रयत्नांतून ‘अमूल’ची सहकारी चळवळ बळकट झाली आणि पुढे भारतीय दुग्धक्षेत्रात मोठे परिवर्तन घडले.या वाटचालीत अडचणींची कमतरता नव्हती. नोकरशाही, जुन्या कार्यपद्धती, हितसंबंध, राजकीय हस्तक्षेप, बाजारातील स्पर्धा आणि परदेशी कंपन्यांचे वर्चस्व अशा अनेक आव्हानांना कुरियन यांना सामोरे जावे लागले. मात्र स्पष्ट ध्येय, व्यवस्थापनकौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी या अडथळ्यांवर मात केली. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू स्वतःचे वैयक्तिक यश नसून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण हा होता.
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्याला उत्पादन व्यवस्थेचा मालक आणि विकासाचा भागीदार बनविण्याची त्यांची कल्पना अत्यंत महत्त्वाची होती. हे सर्व आपल्या या आत्मचरित्रात वाचायला मिळते.
या आत्मचरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे कुरियन केवळ आपल्या यशाची गाथा सांगत बसत नाहीत. संघर्ष, अडथळे, व्यवस्थेतील त्रुटी आणि विरोधाभास यांचीही ते स्पष्टपणे नोंद करतात. त्यामुळे हे पुस्तक एका व्यक्तीच्याआत्मकथनापेक्षा एका मोठ्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा ग्रंथ सुद्धा होते.‘माझंही एक स्वप्न होतं’ वाचताना एक मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नसते; त्या स्वप्नाला स्पष्ट ध्येय, योग्य दिशा, संघटनकौशल्य, परिश्रम आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द यांची जोड द्यावी लागते, हा संदेश देखील आपणाला मिळतो.म्हणूनच वर्गीस कुरियन यांचे हे आत्मचरित्र विद्यार्थी, उद्योजक, शेतकरी, व्यवस्थापनाचा अभ्यास करणारे आणि समाजपरिवर्तनाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवे.



टिप्पण्या