आपल्या शरीरातील बहुमोल ईश्वरी देणगीची माहिती देणारे पुस्तक 'रक्त'
अरे,तो माझा रक्ताचा नातेवाईक आहे,तरी असा कसा काय वागला ? लोक सध्या रक्ताची नाती देखील विसरत चालली आहेत. रक्ताच्या नात्यातील माणसे एकवेळ दगा देतील मात्र आमची माणसे नाहीत.रक्तातील माणसांसारखीच काळजी आमच्या येथे घेतली जाते .या प्रकारची अनेक वाक्ये आपण अनेकदा ऐकतो, बोलतो .हिंदी चित्रपटाचा विचार करता, मै तुम्हारा खून पी जाऊंगा हा एकेकाळचा सुप्रसिद्ध डायलॉग . त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचा विचार करता त्या राक्षसांच्या प्रत्येक थेंबापासून नवीन दैत्य जन्मला येत असल्याचा कथा आहेत .इतिहासात रक्त सांडून लढाई जिंकल्याचे अनेक दाखले देण्यात येतात . रक्ताचे पाणी होणे. या सारख्या अनेक म्हणी वाक्यप्रचार आपल्या मराठीत आहेत जास्त रक्तस्त्राव होऊन रुग्णाचा मृत्यू या बातम्या देखील आपल्या परिचयाचा आहेत .तर असा आपल्या शरीरातील महत्वाचा घटक जो आपल्या संस्कृतीशी देखील जोडला गेला आहे तो घटक म्हणजे रक्त. इतके असून देखील या घटकांविषयी आपल्या मराठीत शास्त्रीय दृष्ट्या अचूक माहिती देणाऱ्या पुस्तकाचा मात्र अभाव होता .
अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये लिखित ‘रक्त’ हे पुस्तक विज्ञान, इतिहास आणि मानवी जीवन यांची एकत्रितपणे माहिती देणारे विविध गोष्टीना साजेने स्पर्श करणारे लेखन आहे. सुमारे ३५० पानांच्या या पुस्तकात ‘रक्त’ या जीवनावश्यक घटकाचा सर्वांगाने विचार केल्याचे जाणवते. . केवळ शरीरशास्त्रापुरते मर्यादित न राहता, हे पुस्तक वाचकाला विज्ञान, संस्कृती, समाज आणि मानवी अनुभव यांची सविस्तर माहिती पुस्तकातून मिळते
पुस्तकात रक्ताचे स्वरूप, त्याचे घटक आणि घटकांची कार्ये जसे लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स, यांची कार्ये अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत. रक्त शरीरात ऑक्सिजन वाहून नेते, रोगांशी लढते आणि संतुलन राखते, हे स्पष्ट करताना उदाहरणांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. त्यामुळे गुंतागुंतीचा विषयही सहज कळतो.
या पुस्तकाचीएक चांगली बाजू म्हणजे रक्ताच्या शोधाचा आणि प्रयोगांचा इतिहास. प्राचीन काळातील अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती आणि सुरुवातीचे धाडसी प्रयोग यांचे वर्णन वाचताना खिळवून ठेवले जाईल अश्या पद्धतीने केले आहे. पुढे रक्ताभिसरणाचा शोध, रक्तगटांची ओळख आणि रक्तसंचार तंत्रज्ञानाचा विकास यामुळे
वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती छान पद्धतीने सांगितली आहे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रक्तपेढ्यांची गरज आणि त्यांचा विकास कसा झाला, हेही सांगितले आहे.याशिवाय, रक्ताशी संबंधित आजार, फॉरेन्सिक सायन्समधील उपयोग आणि गुन्हे उलगडण्यात रक्ताची भूमिका यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. रक्तदानाची संकल्पना आणि त्यामागील मानवतावादी दृष्टिकोन हा देखील पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे. रक्तदान हे केवळ वैद्यकीय गरज नसून सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणिव हे पुस्तक वाचनातून आपल्याला स्पष्टपणे जाणवते
पुस्तकात रक्ताचा सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक अर्थही मांडला आहे. साहित्य, कला आणि परंपरेत रक्त कधी शौर्याचे, तर कधी नातेसंबंधांचे प्रतीक म्हणून दिसते. या विविध दृष्टिकोनामुळे विषय अधिक समृद्ध होतो.एकूणच, ‘रक्त’ हे पुस्तक ज्ञान, इतिहास आणि भावना यांचा सुंदर मेळ साधणारे आहे. सोपी भाषा, सखोल मांडणी आणि व्यापक दृष्टीकोन यामुळे हे पुस्तक वाचकाची जिज्ञासा वाढवते आणि विज्ञानाकडे नव्या नजरेने पाहायला शिकवते.



टिप्पण्या