सिंहगड रोड पुणे शहरातील एक आधुनिकता आणि पारंपरिकता यांच्या अनोखा संगम
त्यासाठी नेहमीप्रमाणे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पी.एम.पी.एम.एल.)चा एक दिवसाचा पास काढला.सकाळी लवकरच मी स्वारगेटहुन सुरूवात केली. बसमधून प्रवास सुरु केल्यावर मी पहिल्यांदा बघितले ते नऱ्हे. येथील वेगाने वाढणारी वसाहत, नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारती आणि तरुणांची वर्दळ माझ्या लक्षात आली.
पुढे चालतच धायरी परिसरात पोहोचलो तेव्हा वाढत्या शहरीकरणासोबतच जुन्या आणि नव्या पुण्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. शांत वातावरण, निसर्गाची जवळीक आणि लोकांमधील आपुलकी मनाला भावली. वडगाव बुद्रुक आणि आनंदनगर परिसरात फिरताना शहरातील दैनंदिन जीवनाचा वेग स्पष्ट जाणवला. बाजारपेठा, शाळा-कॉलेजांची धावपळ, तसेच विविध भागांतून आलेल्या लोकांची वर्दळ या सगळ्या गोष्टी पुण्याच्या जिवंतपणाचे दर्शन घडवत होते.
मी फिरण्यासाठी बस प्रवास करत होतो.ठराविक वेळेत ठराविक ठिकाणी पोहचण्याचे मला टेंशन नव्हते.त्यामुळे मी बस रिकामी असल्याचे किमान खिडकीजवळची जागा मिळण्यासाठी फस्ट प्रेफरन्स देत होतो. यामुळे धायरी नंतर मी बघितले ते मुकुंदनगर .मुकुंदनगरात मला दिसली ती नवीन संधी, नवीन स्वप्ने आणि त्यासाठी धडपडणारी माणसे. गणेश पार्क परिसरात काही वेळ घालवताना मला सवय असलेल्या सदाशिव पेठ,टिळकरोडपेक्षा पुर्णत: वेगळे पुणे मला अनुभवयास मिळाले .त्यानंतर बघितलेल्या वडगाव बुद्रुकला देखील सेम अनुभव मला अनुभवयास मिळाला.
दिवसाच्या काहीस्या शेवटी पुणे महानगरपालिकेचे टोक असलेल्या खडकवासला येथे पोहोचलो तेव्हा मात्र वातावरणात एकदम बदल जाणवला. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, डोंगररांगा आणि शांत निसर्ग यामुळे शहराच्या गोंगाटापासून दूर असल्याचा अनुभव मिळाला. थंड वाऱ्याच्या झुळुकीने दिवसाचा थकवा क्षणात नाहीसा झाला.
मी आता पर्यंत कोथरूड परिसरातील बावनधन सातारा रोडवरील पद्मावती असे काही बेटे म्हणता येतील असे काही भाग वगळता जवळपास सर्वच पुणे शहरात फिरलो आहे त्या वेळच्या अनुभवानुसार सांगतोय पुणे हे केवळ आयटी चे किंवा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले ऐतिहासिक शहरच नाहीये तर पुणे हे अनेक लष्करी संस्थांचे महत्त्वाचे केंद्र तसेच विविध संस्कृती, विचार आणि जीवनशैली यांचा संगम आहे.
टिप्पण्या