एसटीचा प्रवास कुणीकडे?
गेल्या सप्टेंबर महिन्यात 22 तारखेला एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आरामदायी सुविधा देण्यासाठी व्होल्वो बस खरेदी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही खरेदी प्रक्रिया सुरू झालेली असून याबाबत कंपनी निवडण्यात आलेली आहे हे प्रवाशांनाना 14 ऑक्टोबर रोजी व्होल्वो या कंपनीने स्वतःहून जाहीर केलेल्या प्रसिद्धकाद्वारे समजले आणि एकच खळबळ उडाली. व्होल्वो बस कंपनीद्वारे प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात आपली एसटी महामंडळ व्होल्वो बस कंपनीकडून अत्याधुनिक 9600 मॉडेलच्या एकूण 200 खरेदी करणार आहे. त्यापैकी 170 या सीटर प्रकारातील बसेस असून 30बसेस या स्लीपर अधिक सीटर असणार आहेत. खाजगी आणि सार्वजनिक परिवहन सेवेचा विचार करता, एकदम 200 बसेसचे कॉन्ट्रॅक्ट आत्तापर्यंत व्होल्वो कंपनीला आपल्या भारतात कोणीही दिलेले नाही. त्या अर्थाने हा आपल्या महामंडळाने एक पराक्रमच केलेला आहे असे म्हणता येईल.
मात्र हा पराक्रम कोणत्या स्थितीत केलेला आहे? याला अत्यंत महत्त्व आहे. या प्रत्येक बसची अंदाजित रक्कम इंटरनेटवर शोधली असता, एक कोटी तीस लाख रूपये ते दोन कोटी रूपयांपर्यंत आहे. मात्र यामध्ये काही अत्याधुनिक सेवांचा समावेश केल्यास ही किंमत अजूनही वाढते. विविध स्रोतांमधून घेतलेल्या माहितीनुसार आपल्या एसटी महामंडळाला रोज 1कोटी 50लाख ते 2 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. म्हणजेच आपल्याला दैनिक तोटा जेवढ्या रक्कमेचा होतो, तेवढ्या रक्कमेची ही एक बस आहे, आणि आपण 200 बसेस घेणार आहोत. थोडक्यात 200 दिवसांचा तोटा आपण विकत घेणार आहोत. 200 दिवस म्हणजे सुमारे पावणेसात महिने होतात. बर तोटा होतो तर भरून काढता येऊ शकतो.
मात्र आपण आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकत नाहीये आणि पगार देऊ देत नसल्याने आज 15 ऑक्टोबर रोजी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून 7 नोव्हेंबर रोजी संभाव्य संपाची हाक देण्यात आली आहे. या संपकरी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे पूर्वी मान्य केल्याप्रमाणे महिन्याचा सात तारखेला पगार देण्यात यावा. आता पगारची तारीख सांभाळता येत नसताना या महागड्या बसेसची खरेदी करण्यात येत आहे.
एसटी महामंडळाकडून या 200 बसेसची खरेदी करण्यासाठी कारण देण्यात येत आहे ते म्हणजे की श्रीमंत प्रवाशांना एसटी बसचा सेवेकडे आकृष्ट करणे. मुळात एसटी महामंडळाला अपेक्षित असणारा श्रीमंत वर्गाची एसटीबसेस विषयीची मते काय आहेत ? याची एसटीच्या वरिष्ठ प्रशासनाने माहिती काढली आहे का? हा मुळात प्रश्न आहे. जर या वर्गाची चर्चा केल्यास एसटीच्या बसेस अत्यंत अत्यंत थर्ड क्लास असतात (हो थर्ड क्लास तो त्यांच्या शब्द आहे .) आणि आता मोबाईल मधील विविध एप्लीकेशनद्वारे कार बुक करुन एसटी बसच्या तुलनेत कमी खर्चात आणि अधिक आरामदायी पद्धतीने प्रवास करता येते असे अत्यंत सहज बोलले जाते हे लक्षात येईल.अशा स्थितीत हा कथाकथित श्रीमंत वर्ग या बसेसमार्फत एसटी महामंडळाकडे जोडला जाईल हे याचे गृहीतक कोणत्या आधारे मांडण्यात आले हाच मुळात प्रश्न आहे.
आम्ही एसटी महामंडळ वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आम्हाला अपयश आले. त्यात आम्ही काय, करणार? असं सांगत स्वतःचे खिसे भरण्याचा एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हेतू यातून स्पष्टपणे दिसून येतोय. काही दिवसापूर्वी नाशिक - त्रंबकेश्वर रस्त्यावर नादुरुस्त बस वेडी वाकडे वळणे घेत फिरत असल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. एकीकडे जो वर्ग एसटीचा मुख्य आधार आहे तो वर्ग ज्या प्रकारच्या बसेसमधून प्रवास करतो त्या दुरुस्त करायला महामंडळाकडे पैसे नाहीये, आणि जो वर्ग एसटीकडे ढुकुंन देखील बघत नाही तो वर्ग ज्या प्रकारच्या बसमधून फिरतो त्या प्रकारच्या बस विकत घेण्याच्या महामंडळाच्या निर्णयाचे वर्णन कोणत्या शब्दात करावे हेच कळेनासे होते.
काही दिवसापूर्वी एसटी महामंडळाच्या जागा या खासगी सरकारी भागीदारीतून विकसित करण्याच्या तुघलकी निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यामध्ये अजून एका निर्णयाची भर असेच याबाबत आपणास म्हणता येऊ शकते. मात्र या तूघलकी निर्णयाचा परंपरेमुळे एसटी महामंडळाचा पारंपारिक प्रवासी आहे त्याला इच्छा नसताना सुद्धा अन्य खासगी वाहतुकीच्या आधार घ्यावा लागणार. आता खेड्यांमध्ये चालणाऱ्या जीप ज्याला अनेक ठिकाणी काळी पिवळी असे म्हणतात त्यामध्ये कोणत्या पद्धतीची सुरक्षितता असते ? एसटी महामंडळाची खूप मोठी सुरक्षा असते असेही नाही. मात्र या दहा रुपये, पंधरा रुपये घेऊन प्रवासी क्षमतेच्या कितीतरी जास्त पट होणारी वाहतूक ही एसटी महामंडळातून होणाऱ्या वाहतूकीचा विचार करता असुरक्षितच याबाबत कोणाचे दुमत नसावे.
जर कोणी म्हणत असेल की व्होल्वो बस सेवा ही खेडेपाडी चालवण्यात येणार नसून मोठमोठ्या शहरात चालवण्यात येणार आहे त्यामुळे ही तुलना अप्रत्सुत आहे, तर ते चुकीचेच म्हणावं लागेल. कारण या विनाकारण च्या पांढऱ्या हत्तीच्या खर्च हा वसूल करताना या खेड्यापाड्यातील बससेवेचा बळी जाणारच हेच दुर्दैवी विधी लिखित आहे आणि त्याचा फटका गोरगरीब जनतेला बसणारच.
एकीकडे तब्बल 21 वर्षांनी आपल्या शेजारच्या मध्य प्रदेश मध्ये एसटी बस महामंडळ पुनर्जिवीत करत असताना आपल्याकडे मात्र ते बंद करण्याच्या घाट अत्यंत पद्धतशीरपणे घातला जातोय हे दुर्दैवच आहे. हे दुर्दैव आपल्यास कमीत कमी त्रास देणारे ठरो ईश्वरचरणी प्रार्थना
टिप्पण्या