सवलती आवरा कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद घ्या

गुरुवार 15 ऑक्टोबर रोजी आपल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या बाबत दोन बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यातील एक होती यंदाचा दिवाळीच्या सुट्टीच्या हंगामात आपल्या महामंडळाच्या बसचे भाडे न वाढवण्याची तर दुसरी होती आपल्या प्रलंबित मागण्यासाठी ज्यात मुख्यत: आर्थिक मागण्या प्रामुख्याने आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संभाव्य संप हा 7 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे ही. महाराष्ट्र एसटी महामंडळात या दोन बातम्या हेडलाईन्स होत असताना आपल्या शेजारच्या अर्थात गुजरात मध्ये सुद्धा एसटी महामंडळ विषयी  एक घडामोडी घडली. ती होती गुजरात राज्य परिवहन महामंडळ अर्थात गुजराती एस टी चा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात दोन टक्क्यांची वाढ होत तो आता 60 टक्के झाल्याची.

तसं वर बघायला गेल्यास अनेकांना महाराष्ट्र राज्याची एसटी आणि गुजराती एसटी यांची तुलना करणे अप्रस्तुत चुकीचे वाटेल
 मात्र तसं नाहीये. आपल्या भारत सरकारने संसदेत 1956 साली सार्वजनिक वाहतूक परिवहन कायदा संमत केला त्यानंतर विविध राज्यात त्या त्या राज्यांच्या राज्य परिवहन व्यवस्था अर्थात आपण ज्याला बोली भाषेत एसटी बस म्हणतो ती प्रणाली अस्तिवात आली मात्र केंद्र सरकारने कायदा करण्याच्या आधीच आठ वर्षे  अर्थात भारताचा स्वातंत्र्यानंतर फक्त एका वर्षाच्या आतच जून 1948 साली त्या वेळच्या मुंबई राज्याने आपल्या राज्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था सुरू केली. पुढे मे 1960 मध्ये त्याच मुंबई राज्याचे दोन तुकडे होऊन आपला महाराष्ट्र आणि गुजरात राज्य अस्तिवात आले. मुंबई राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरात राज्य वेगळे होत असताना त्यांना मुंबई राज्याची वाहतूक व्यवस्था अर्थात एसटी बस जन्मताच मिळाली. आज ऑक्टोबर 2026 मध्ये भारतात असणाऱ्या 28 राज्यांचा विचार करता क्षेत्रफळाने तिसरे मोठे राज्य म्हणजे आपले महाराष्ट्र असले आणि पाचवे मोठे राज्य म्हणजे गुजरात असले तरी दोघांच्या क्षेत्रफळात फारसा फरक नाहीये. गुजरात राज्यात वलसाड आणि डांग या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग आहे
 तसेच गुजरात- राजस्थान सीमेवरील काही भाग हा डोंगराळ आहे. या उलट महाराष्ट्रात डोंगराळ भागाचे प्रमाण गुजरातच्या तुलनेत थोडे जास्त आहे. डोंगराळ भागात बस वाहतूक करताना घसारा जास्त होतो या उलट गुजरात सारख्या मैदानीचा पठारी प्रदेशात बस चालवताना बसचा घसरा थोडा कमी होतो. घसारात फरक होत असल्याने मेकॅनिकल खर्च थोडा बदलतो मात्र हा बदल सोडता महाराष्ट्र एसटी आणि गुजरात एसटी अनेक बाबतीत सारख्या असायला हव्या मात्र वस्तुस्थिती तशी नाहीये आपण पुढील मुद्द्यांद्वारे हे अधिक सविस्तर समजून घेऊ शकतो

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मूळ वेतनाचा तुलनेत

जून २०२५ पूर्वीचा दर: ४६%
जून २०२५ पासून: ५३%
जून २०२६ मध्ये घोषित नवीन दर: ५८%

या कालावधीत गुजरात राज्य परिवहन महामंडळ अर्थात गुजरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाचा तुलनेत

ऑगस्ट २०२५ पूर्वी ५३%
ऑगस्ट २०२५ मध्ये वाढीनंतर ५५%
जून २०२६ मध्ये वाढीनंतर ५८%
१५ऑक्टोबर २०२६ नंतर ६०%

ही आकडेवारी बघितल्यास आपल्या सहज लक्षात येते की महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत गुजरात एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता नेहमीच जास्त मिळत आलेला आहे. अजून एक आकडेवारी सांगतो. ही आकडेवारी आहे दोन्ही दोन्ही राज्यांच्या एसटी महामंडळांकडून देण्यात येणाऱ्या प्रवाशी तिकीटावर देण्यात येणाऱ्या सवलतीचा आकडा. तर माझ्या वाचक मित्र-मैत्रिणींनो गुजरात एसटीच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीचा आधार घेतला असता गुजरात राज्याकडून 17 प्रकारच्या ऑनलाइन तिकीट सवलती देण्यात येतात समजा ज्या तिकीट सवलती ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत नाहीत त्यांची संख्या सुद्धा 17 आहे असे समजले तरी गुजरात एस टी कडून जास्तीत जास्त 34 प्रकारच्या तिकीट सवलती देण्यात येतात असे आपण म्हणू शकतो. या उलट महाराष्ट्र एसटी कडून तब्बल 52 प्रकारचा तिकीट सवलती देण्यात येतात आता 17 ऑनलाईन पद्धतीचा आणि आपण 17 ऑफलाईन पद्धतीच्या समजलेल्या आहेत प्रत्यक्षात ऑफलाइन पद्धतीने देण्यात येणाऱ्या तिकीट सवलती शेवटी कमीच असतील पण आपण तेवढ्यात आहेत असे समजले तरी  52 हा जवळपास दोन तृतीयांश आकडा होतो म्हणजेच गुजरात एसटी महामंडळापेक्षा आपण जवळपास एक तृतीयांश सवलती जास्त देतो अर्थात फक्त ऑनलाईन सवलतीचा आकडाचा आपण धरला तर हा आकडा तब्बल तिप्पट होतोय हे लक्षात घ्या.

या अनावश्यक सवलतींचा परिणाम महाराष्ट्र राज्याच्या एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होतो आणि आपण पहिले बघितले तसे दोन्ही राज्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता चा विचार करता गुजरात नेहमीच महाराष्ट्रापेक्षा पुढे जाते. 

आता येऊया 15 ऑक्टोबर 2026 ला. या दिवशी गुजरात एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला त्याचवेळी आपल्याला वेळेत पगार मिळावा या मुख्य मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यासाठी आम्ही संप करणार आहोत असे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना म्हणावे लागले. याच दिवशी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात वाढ न करण्याची जी घोषणा केली ती सुद्धा आपण संपास जोडून घेऊ शकतो. कर्मचाऱ्यांनी संप केल्यास आपण प्रवासश्यांकडून जे अतिरिक्त भाडं वसूल करत आहोत ते आपल्याला परत देणं अवघड होईल असे एसटी महामंडळाच्या वरीष्ठ प्रशासनास वाटल्याने त्यांनी भाडेवाढ टाळली असावी असे म्हणण्यास खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. एकीकडे गुजरात राज्य त्यांच्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के ने वाढवते आहे त्याच दिवशी शेजारच्या महाराष्ट्र राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ सोडा जो पगार आहे तो वेळेवर द्यावा म्हणून संपाची हाक द्यावी लागते आणि या संपाचा हाके मुळे आपल्या अडचणीत वाढ होऊ नये म्हणून वरिष्ठ प्रशासन अन्य राज्यातील एसटी महामंडळ खासगी वाहतूकदार बस भाड्या त मोठ्या प्रमाणात वाढ करत असताना आपल्या महामंडळासाठी की त्यात वाढ करत नाहीये, आहे की नाही गंमत. 

माझ्या मते एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बघता या सवलतींचा आढावा घेत ज्या सवलती विनाकारण आहेत त्या तिकीट सवलती  तात्काळ प्रमाणे बंद करणेच योग्य आहे. अनावश्यक तिकीट सवलती बंद करून त्यामुळे वाढलेला नफा हा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवण्यासाठी वापरल्यास ज्या कर्मचाऱ्यांमुळे एसटी महामंडळाला पैसा मिळतो आहे त्या कर्मचाऱ्यांचा चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने आनंद झळकेल ते प्रसन्न मनाने एसटी महामंडळाला आशीर्वाद देतील ज्यामुळे एसटी महामंडळ खऱ्या अर्थाने लोकसेवा करू शकेल हेच खरे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास