पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ११(पर्यटन म्हणजे नक्की काय )
मी, सध्या माझ्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मी ज्या शहरात राहतोय, त्या पुणे शहरातील विविध भागांना भेटी देतोय, हे एव्हाना आपणास माहिती असेलच. त्याच संदर्भात माझ्या एका मित्राशी बोलताना, हे काय पर्यटन म्हणायचे? पर्यटन म्हणजे दुसऱ्या देशात फिरायला जाणे. ते जमले नाही तर दुसऱ्या राज्यात जाणे.तेही जमेल नाही तर भलेही आपल्याच राज्यात असे ना, दुसऱ्या शहरात जाणे होय.आपण ज्या शहरात राहतो.त्याच शहराच्या वेगवेगळ्या भागांना भेटी देणे म्हणजे पर्यटन म्हणायचे का ? हा मुद्दा निघाला.मुद्दा निघाला खरा मात्र काही कारणाने त्यावर चर्चा काही आमच्यात रंगू शकली नाही.जरी आमच्यात चर्चा रंगू शकली नसली तरी माझ्या मनात विचारचक्र मात्र सुरू झाले.तेच तूमच्यापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन.
तर प्रत्येक शहराचे नव्हे तर शहरातील प्रत्येक भागाचे एक स्वतंत्र्य वैशिष्ठ असते. आपण ज्या शहरात राहतो.त्या शहराचे सर्वसाधरण वैशिष्ठ आपणास माहिती असते.मात्र आपल्या शहरातीलच मात्र आपण फारसे न गेलेल्या भागाचे वैशिष्ट आपणास माहिती असेलच असे नाही.उदाहरणार्थ आपण पुणे शहरातील गणेश पेठ, रविवार पेठ याला एक भाग समजूया, तर सदाशिव पेठ, नारायण पेठ या भागाला दुसरा भाग समजूया.आता या भागात सर्वसाधरण चक्कर टाकली तरी, लोकांचा पेहरावात काहीसा फरक दिसतो. एका विशिष्ट व्यक्तीसमुहाची गर्दी आपणास रविवार पेठ,गणेश पेठ भागात दिसते.याचा उलट स्थिती दुसऱ्या भागात दिसते. हाच प्रकार आपणास सेनापती बापट रोड, फर्गसन कॉलेज रोड परिसर याला एक युनिट समजले आणि सहकार नगर, बिब्बेवाडी याला दुसरा युनिट समजले तरी लक्षात येतो.पहिल्या भागात दिसणारा बिनधास्त बोल्डनेस मला तरी दुसऱ्या भागात आढळला नाहीये.हडपसर आणि कोथरुड ही एकमेकांच्या विरूद्व दिशेतील मात्र पुणे शहराची उपनगरे त्यात हा फरक दिसतो.नळस्टॉप एस.एन.डि.टी.आणि प्रभात रोड तर अगदी पाठिला पाठ लावलेले भाग मात्र त्यातही जर लक्ष्यपुर्वक बघितले तर फरक जाणवतो. मी वर जे सांगितले ती असते त्या विशिष्ट परिसराची संस्कृती.जी पुणे शहराच्या संस्कृतीचा भाग असली तरी एकमेकांपासून मोठ्या प्रमाणात वेगळी आहेत.ही भिन्नता लक्षात यावी,यासाठी स्वत:च्या शहराचे पर्यटन आवश्यक असते.कारण या प्रत्येक संस्कृतीचे स्वत:ची एक ओळख असते. जी आपणास फक्त त्या शहराला भेट देऊनच समजू शकते.
आपण जेव्हा एखाद्या दुसऱ्या भागाला भेट देतो. त्यावेळी त्या प्रदेशाची सर्वसाधारण संस्कृती आपणास समजते.मी लेखाच्या सुरुवातीला संगीतले तसे त्या शहराच्या संस्कृतीचे विविध कंगोरे आपणास समजत नाही. आता आपण ज्या शहरात राहतो,त्या शहराच्या संस्कृतीच्या विविध कांगोरे माहिती असणे आवश्यक की, वेगवेगळ्या शहराच्या संस्कृतीची सर्वसाधरण ओळख महत्त्वाची यावर मोठा वाद होऊ शकतो.सबब यावर माझ्याकडून नो कमेंटस .माझ्यामते हा निर्णय ज्याने त्याने स्वत:च्या बुद्धीनुसार घ्यावा, आणि त्यानुसार अति स्थानिक पर्यटन (आपण राहतो त्या शहराचे भाग) बघत पर्यटन करायचे की दुसरे शहर, राज्य, देश बघत पर्यटन करायचे हे ठरवावे.मात्र फिरावे हे मात्र नक्की..!
टिप्पण्या