गोर गरिबा छळू नका. एसी रुममध्ये बसुनी निर्णय घेऊ नका.
परिवहन मंत्री,
महाराष्ट्र राज्य यांच्या सेवेसी
सप्रेम जय महाराष्ट्र
विषय : वस्तुस्थिती जाणून निर्णय लागू करणे बाबत
साहेब, सध्या आपण एसटीला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी अत्यंत धाडसी निर्णयांचा सपाटा लावलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपले मनःपूर्वक धन्यवाद. आदिवासी पाड्यातील शेवटचा घटकापर्यंत एसटी बस सुरू करण्यात यावी यासाठी आपण करत असलेले कष्ट तसेच एसटी महामंडळाला आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्यासाठी आपण योजत असलेले तसेच एसटीकडे विविध घटकातील नागरिक आकृष्ट व्हावे यासाठी आपण करत असणारे निर्णय खरोखरच प्रशंसणीय आहेत. आपल्या रूपाने एसटी महामंडळाला अनेक वर्षांनी एक कार्यक्षम मंत्री मिळालेला आहे हे आमचे सौभाग्यच.
याच धडाधडीच्या निर्णयाचा सपाटा लावताना, आपण वार गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी एसटी महामंडळाच्या परिसर स्वच्छ असावा, यासाठी एक निर्णय जाहीर केला तो म्हणजे, जर एसटी बस स्थानक अस्वच्छ असल्यास थेट विभाग प्रमुखांना जबाबदार धरण्याचा. साहेब एसटी महामंडळाच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेचा फायदा घेत मी आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चार जिल्ह्याचा अपवाद करत महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात तसेच महाराष्ट्र बाहेर गुजरात राज्यात अहमदाबाद, सुरत, वापी, मध्य प्रदेश मधील इंदोर, गोवा राज्यातील पणजी, कर्नाटक राज्यातील बेळगाव आणि बंगळूर आदी ठिकाणी फिरलो आहे. या फिरण्याचा अनुभवातून मी आपणास हे लक्षात आणून देतो की आपला एसटी परिसर स्वच्छतेबाबत चा निर्णयाचे वर्णन हेतू चांगला मात्र राबवण्याची पद्धत पूर्णतः चुकीची असंच करावं लागेल.
साहेब मी आवडेल तिथे प्रवास या योजनेच्या मार्फत प्रवास करताना जेव्हा जेव्हा आपल्या बस स्टँडवरील प्रसाधनगृहांचा वापर केला त्या त्या वेळस मला लक्षात आले की, एसटी महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी अक्षरश: जीवाचे रान करत, रक्ताचे पाणी करत प्रसाधनगृह स्वच्छ करत असतात. मात्र आपल्याकडील प्रवाशांना मुळात सिव्हिक सेन्स हा कमी असल्याने, त्यांचे प्रयत्न कमी पडतात आणि प्रसाधनगृहे अस्वच्छ होतात. मी अनेकदा बस प्रवासामध्ये अनुभव घेतला आहे की बस स्टँड वरील प्रसाधनगृहात अनेक नागरिक प्रसाधनगृह वापरल्यानंतर पुरेसे पाणी टाकत नाहीत. किंबहुना प्रसाधनगृह वापरल्यानंतर पाणी टाकल्यास त्यांना त्वरित जागेवरच फाशी देण्यात येईल याबाबत त्यांना खात्री असावी असे त्यांचे वर्तन असते. जर आपण त्यांना काही सांगायला गेलो तर हे प्रसाधनगृहे तुझ्या बापाचे आहे का ? नाही ना? मग तू मला सांगणार कोण ? असा अर्विभाव असतो. या प्रवासादरम्यान मला आढळलेली एक सर्वसाधारण गोष्ट म्हणजे अनेकदा प्रवासी बस मधून उतरताना आपल्या आसनावरील रिकाम्या बाटल्या चिप्स पाकीट हे उचलून कचरा पेटीत टाकण्याचे कष्ट घेत नाहीत ते तिथेच टाकून जातात. त्यामुळे होणारा आपला एसटी बसेस आणि परिसर स्वच्छ करण्याचे काम हे कर्मचारी करत असतात.
मात्र आपल्याकडे असणारी लोकसंख्या आणि लोकांची सार्वजनिक ठिकाणी वागण्याबाबतची बेपर्वा वृत्ती यामुळे या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः एकही सेकंद न झोपता सातत्याने स्वच्छ करत बसले तरी ते स्वच्छ होणे शक्य नाही. स्वच्छता कर्मचारी सुद्धा आपल्यासारख्या हाडामासाच्या व्यक्ती आहेत लोकांनी घाण करायची आणि ती या लोकांनी आवरायची याला देखील काही प्रमाणात मर्यादा आहेत गरीब आहेत म्हणून त्यांना काहीही वागवणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही परिपत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केलेला आहे.त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना जे कर्मचारी थेट प्रसाधन गृह स्वच्छ करतात त्यांच्यावर मोठी बंधने येतील वरचे अधिकारी काय खालच्या कर्मचाऱ्याला आदेश सोडणे हे काम करतील जर काही अडचणीमुळे खालच्या कर्मचाऱ्यांनी आदेशाचे पालन केले नाही तर आलीच निलंबनाची कार्यवाही मात्र आपण दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी करताना खालच्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागेल याबाबत या वरिष्ठांना माहिती असण्याची सुताराम शक्यता नाही त्यामुळे शोषण मात्र या कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांचे नक्कीच होणार सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
साहेब आपला हेतू अत्यंत चांगला आहे प्रामाणिक आहे यात शंकाच नाही एसटी महामंडळाच्या परिसर आणि बसेस या स्वच्छ असल्याच पाहिजे मात्र सर्व काही कर्मचाऱ्यांचा हाती सोडणे अत्यंत चुकीचे आहे. प्रवाशांनी सुद्धा त्यांची जबाबदारी ओळखून वागणे अत्यावश्यक आहे आणि प्रवाशांची जबाबदारी त्यांना सांगणे हे सुद्धा एसटी महामंडळाचे महत्त्वाचे काम आहे. काही दिवसापूर्वी जसे रेल्वेमध्ये विनाकारण आवाज करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना त्या विषयीच्या घोषणा या रेल्वे स्टेशनवर करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते त्याच पद्धतीने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्टॉप वर स्टैंड वर याबाबत सर्वप्रथम किमान सहा महिने तरी उद्घोषणा करण्यात यावी. तसेच सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून याबाबत नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती झाल्यावरच तुम्ही पत्रकामध्ये जाहीर केलेल्या बाबींनुसार कार्यवाही करण्याचे सुरुवात करावी असे मला एसटी महामंडळाच्या नियमित प्रवास करणारा प्रवासी म्हणून वाटतंय अन्यथा आहे ताकद म्हणून केला निर्णय अन्यांच्या नाही केला विचार यासारखी हुकूमशाही वृत्तीच दिसून येईल असे मला खेदाने म्हणावे लागेल.
टिप्पण्या